अहमदनगर - राजकारणात अनेक नेते विविध कारणास्तव एकमेकांना भेटत असतात, त्यात गैर काही नसते. पवार-शाह भेट झाल्याबाबत आपणास काही माहिती नाही. मात्र आमच्या अनेक नेत्यांनी भेट झाली नसल्याचे सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
पवार-शाह भेटीबाबत रोहित पवार काय म्हणाले वाचा...
राजकारणात अनेक नेते विविध कारणास्तव एकमेकांना भेटत असतात, त्यात गैर काही नसते. पवार-शाह भेट झाल्याबाबत आपणास काही माहिती नाही. मात्र आमच्या अनेक नेत्यांनी भेट झाली नसल्याचे सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
कुठेतरी बातमी आली म्हणून भाजपचे काही जण राजकारण करत असले तरी तो त्यांचा भाग आहे. पण भेट झाली की नाही हे मला माहित नाही, असेही रोहित पवार यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी याविषयावर एकदम स्पष्टपणे उत्तर न देता पक्षाच्या इतर नेत्यांचा हवाला देत अशी भेट झाली नसल्याचे सांगितले.
पवारांवर जनतेचे अमाप प्रेम, ते लवकरच बरे होतील -
शरद पवार यांच्यावर जनतेने अमाप प्रेम केले आहे. त्यामुळे जनतेच्या सदिच्छा पाठीशी असल्याने पवार लवकरच पुन्हा बरे होऊन नियमित काम करताना दिसतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. पित्ताशयात झालेल्या खड्यांमुळे त्यांचा त्रास वाढला होता, त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. अजूनही एक ऑपरेशन करावे लागणार आहे. मात्र काळजीचे कारण नसल्याची माहिती रोहित यांनी दिली. शस्त्रक्रियेनंतर भूल उतरू लागताच त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना बाबतची माहिती तिथे उपस्थित असलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून घेतली. त्यामुळे त्यांना आपल्या राज्याबद्दल असलेली काळजी पाहून लोकनेता कसा असतो याचा आपल्याला प्रत्यय आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
परमबीर यांच्याबाबत न्यायालय योग्य निर्णय घेईल-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत आरोप करत तसेच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली बाबत आक्षेप घेत प्रथम सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना न्यायालयाने एकप्रकारे फटकारले, याबाबत आमदार पवार यांना विचारले असता, त्यांच्या आरोपांबाबत आम्ही अगोदरच आमचे मत मांडलेले आहे. मात्र आता तो प्रश्न न्यायालयाच्या कक्षेत असल्याने न्यायालय योग्य तो निर्णय त्याबाबतीत घेईल, असे पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा -शिर्डीकरांना शासनाने करमाफी द्यावी, शिष्टमंडळाची मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
हेही वाचा -महापालिकेने गौरवले, अन्न-औषधने फटकारले; स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या हॉटेलचा परवाना निलंबित