अहमदनगर- भाजपाचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात झालेल्या हल्ल्यातील तरुण हा राष्ट्रवादी पक्षाचा समर्थक असल्याचे सांगत त्याचे आमदार रोहित पवारांसोबतचा फोटो पडळकर यांनी व्हायरल केला आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, कार्यकर्त्याने जे केले अशा गोष्टी घडू नये, असे सांगतानाच संबंधित युवकाने केलेली कृती ही प्रेमापोटी असू शकते, असे सांगत तरुणाची बाजू घेतली. पडळकरांना या हल्ल्यात काही झाले नाही ही चांगली गोष्ट आहे असेही ते म्हणाले. कर्जत इथे माध्यमांशी बोलताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. अनेक कार्यकर्ते हे सोबत फोटो काढत असतात. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असलेल्या फोटोत गुंड होते. त्यामुळे उगाच फोटोवरून विषय कोणीही वाढवू नये, असा टोला त्यांनी पडळकर यांना लगावला. त्याचबरोबर, पडळकर जी भाषा वापरत आहे ती योग्य आहे का, फडणवीस यांना ती मान्य की अमान्य हे त्यांनी स्पष्ट करावे, म्हणजे भाजपाची विचारसरणी आमच्याही लक्षात येईल, असा उपरोधिक प्रश्नही रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
कोरोनाचा तिसरी व्हेव भयानक, म्हणून..
कोरोनाच्या पहिल्या लाटेला मी सुद्धा गंभीर घेतले नव्हते, मात्र दुसऱ्या लाटेची भयानकता आपण सर्वांनी अनुभवली आहे, असे सांगत रोहित पवार यांनी तिसऱ्या संभाव्य लाटेबाबत आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. कदाचित म्हणूनच पावसाळी अधिवेशन हे दोन दिवसांचे आयोजित केले असावे असे मत त्यांनी मांडले. मलाही लोकप्रतिनिधी म्हणून अधिवेशनात बोलण्याची इच्छा आहे, अनेकांना असते, मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लसने डोके वर काढले तर अतिभयानक परस्थिती उद्भवू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे आहे असे पवार यांनी सांगत समर्थन केले.