अहमदनगर - जलसंधारणाच्या माध्यमातून गाव पाणीदार होण्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत प्रत्येक गावाने सहभाग नोंदवून जलसंधारण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
जामखेडमध्ये जलसंधारण वॉटर कप स्पर्धा आणि सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी मतदार संघातील सरपंचांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मान तालुक्याचे उदाहरण पवार यांनी नागरिकांना दिले. तेथील लोकांनी जलसंधारणाची चळवळ हातात घेतली म्हणून १०० कोटी पेक्षा जास्त निधी गोळा झाला. त्यातून जलसंधारणाची कामे पूर्ण केली. अशीच चळवळ जामखेड तालुक्यात उभी करणे गरजेचे आहे. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.