अहमदनगर -महाविकास आघाडी सरकार पूजा चव्हाण प्रकरण गांभीर्याने घेत आहे. तिच्यावर अन्याय झाला असेल तर तिला नक्कीच न्याय मिळेल. मात्र अगोदर पोलीस चौकशी पूर्ण होणे गरजेचे आहे, त्यानंतर कोणी दोषी आढळले तर गुन्हा दाखल होऊन शिक्षाही होईल, असे स्पष्टीकरण आमदार रोहित पवार यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर केले आहे.
'अगोदर पोलीस चौकशी, तपास गरजेचा'
अहमदनगरमध्ये याप्रकणावर बोलताना ते म्हणाले, की चर्चा वेगवेगळ्या सुरू असतात, मात्र महाविकास आघाडी सरकार आणि पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पूजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. मात्र कुणाला दोषी पकडून शिक्षा होण्यासाठी अगोदर पोलीस चौकशी, तपास होणे गरजेचे असते. सरकार याबाबतीत गंभीर असल्याची पुष्ठी त्यांनी यावेळी केली.
'राजीनाम्याच्या गोष्टी भाजपाने करू नये'
भाजपा याप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मागत असले तरी त्यांच्या काळात विविध प्रकरणात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले, पण एकाही मंत्र्याने त्यावेळी राजीनामा दिला नाही किंवा घेतला नाही. त्यामुळे राजीनाम्याच्या गोष्टी भाजपाने करू नये, असे सांगत आ. पवार यांनी महाविकास आघाडी सरकार कुणाला पाठीशी घालणार नाही. याप्रकरणात कोणी दोषी आढळला तर निश्चित कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.