अहमदनगर- शिर्डी साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. साईबाबांच्या जन्मस्थळावरून पाथरीच्या विकास निधी देण्यास आमचा विरोध नाही, पण पाथरीकरांकडून केल्या जाणाऱ्या दाव्याला सरकारने भावनिकतेतून पाठबळ देवू नये, असे सुचित करताना या वादामागील प्रवृत्तीही आता शोधण्याची वेळ आली आहे. उद्यापासून (दि. 19 जाने.) शिर्डीसह 25 गावे बंद राहणार असून जर मुख्यमंत्र्यांनी उद्यापर्यंत आपली भूमिका स्पष्ट नाही केली तर हा बंद बेमुदत करण्यात येईल. बंदला माझाही पाठिंबा असल्याचे विखे पाटलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
साईबाबांच्या जन्मस्थळावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार विखे पाटील यांनी शिर्डी विश्रामगृहात गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार विखे पाटील यांनी उद्याच्या बंदला माझा पाठींबा असून, शिर्डीकर ग्रामस्थ जो निर्णय घेतील त्यांच्या भुमिकेबरोबर मी आहे असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, साईबाबांच्या जन्मस्थळाचे दावे यापूर्वीही 8 ते 10 वेळा केले गेले. असे वाद जाणीवपूर्वक उपस्थित करुन लाखो साईभक्तांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न होत आहे का? शिर्डीची सामाजिक, अध्यात्मीक घडी मोडण्याचा प्रयत्न केला जातोय का? या मागे नेमक्या कोणत्या प्रवृत्ती आहेत हे शोधण्याची आता खरी गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - शिर्डीकरांनी बंद मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन; नीलम गोऱ्हेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
आपल्याकडे ऋषीचे कुळ आणि नदीच मूळ कधीच शोधु नये, असे म्हटले जाते. त्याच प्रमाणे साईबाबांनी आपल्या हयातीत जात, धर्म, पंथ कधी उघड केले नाहीत. जातीचा आणि धर्माचा अडसर माणुसकीत येवू नये हाच विचार साईबाबांनी मांडला. त्यामुळेच जगभरातील भाविकांसाठी शिर्डी हे श्रध्दास्थान सर्वधर्म समभावाचे प्रतिक ठरले आहे. याकडे लक्ष वेधुन विखे पाटील म्हणाले की, सबका मालिक एक हा संदेश घेवून देशात आणि देशाबाहेर साईबाबांची असंख्य मंदिरे उभी राहिली. ती त्या त्या भागाच्या सामाजिक उत्कर्षासाठी कारणीभूत ठरली. पाथरीचे साईमंदिर हे त्यापैकीच आम्ही एक मानतो. या परिसराचा विकास करण्यास आमचा विरोध नाही. पण, साईबाबांच्या जन्मस्थळाचा भावनिक मुद्दा उपस्थित करुन तो विकास नको ही आमची भूमिका आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.