अहमदनगर- देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्यापासून सतत दीड वर्ष कोरोना बाधितांच्या सेवेत झोकून दिलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन मध्ये समावेश झाला आहे. संस्थेच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष फराह सुलतान अहमद यांनी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार निलेश लंके यांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन संस्थेच्यावतीने गौरविण्यात आले.
पहिल्या लाटेत पायी वाटसरूंना केली रस्त्यावर उभी राहून मदत-
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समाविष्ट झालेले निलेश लंके देशातील पहिले आमदार ठरले आहेत. लंके यांनी टाळेबंदीच्या सुरुवातीला परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील कामगार, मजूर, तालुक्यात विलगीकरणमध्ये असलेल्या नागरिकांसाठी नगर - पुणे रस्त्यावर अन्नछत्र सुरू केले होते. पायी वाटसरूंना चप्पल मोफत वाटल्या. तसेच टाकली धोकेश्वर इथे एक हजार खाटांचे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर कोविड केअर सेंटर उभारले.
आमदार निलेश लंकेंचा सन्मान.. दुसऱ्या लाटेत आमदार लंकेची देशभर चर्चेत-
संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी लंके यांनी भाळवणी येथे एक हजार १००० खाटांचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू केले आहे. मतदारसंघातील तसेच राज्याच्या विविध भागातील बाधिताबरोबरच परराज्यातील कोरोना बाधित भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झाले. आजपर्यंत आठ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. लंके यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांचा समावेश वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये केला आहे.
मतदारसंघातील जनतेला पुरस्कार समर्पित-
कोरोना रूग्णांसाठी केलेल्या कामगिरीबददल मिळालेला लंडन येथील वर्ल्ड बुक रेकॉर्ड पुरस्कार आपण मतदारसंघातील विधवा, परित्यक्त्या, अपंग, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आरोग्य मंदीरात काम करणारे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, नीलेश लंके प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील जनतेला समर्पीत करीत असल्याची प्रतिक्रिया आमदार नीलेश लंके यांनी मुुंबईत पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली.
लंकेच्या कामाचे संस्थेकडून भरभरून कौतुक-
यावेळी बोलताना फराह अहमद म्हणाल्या कोरोना संकटात लंके यांंनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याची संपूर्ण जगाने दखल घेतली. कोणत्याही माध्यमांवर नजर फिरविली की सर्वत्र लंके यांचे भरीव काम दिसून येते. त्यांच्या या कार्याची आमच्या संस्थेने दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या नावांमध्ये आमदार लंके यांचेच नाव सर्व बाबतीत आघाडीवर राहिले. त्यामुळे पुरस्कार्थीची निवड करण्यास काहीही अडचणी आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आमदार लंके म्हणाले, 'कोरोना संकट उभे राहिल्यानंतर पहिल्या लाटेमध्ये अडीच लाख वाटसरूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अनवानी चालणाऱ्या वाटसरूंना चपलांचे वितरण करण्यात आले. लॉकडाउन शिथील करण्यात आल्यानंतर परराज्यात, परजिल्ह्यात जाणाऱ्या नागरीकांसाठी निवाऱ्याची, भोजनाची तसेच त्यांच्या गावांना जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतरच्या काळात कर्जुलेहर्या येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर सुरू करण्यात येऊन साडेपाच हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये तब्बल हजारो रूग्णांवर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे रूग्णांना आधार देण्यात आल्याने एकाही रूग्णाचा आरोग्य मंदीरात मृत्यू झाला नाही. माझ्या हातून समाजासाठी हे चांगले काम झाले त्याची दखल लंडनच्या संस्थेने घेतल्याने या कामासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे, तेथे सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे चिज झाले असेच म्हणावे लागेल.' हा पुरस्कार आपण मतदारसंघातील जनतेला समर्पीत करीत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मुंबईत पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यास आमदार लंके यांचे सहकारी उपस्थित होते. यात बाबाजी तरटे, अॅड. राहूल झावरे, डॉ. संतोष भुजबळ, बाळासाहेब खिलारी, मुकूंदा शिंदे, सत्यम निमसे, अमोल उगले, नितीन चिकणे, गोकुळ शिंदे, दादाभाऊ रेपाळे, भाउसाहेब डुकरे, बाजीराव कारखिले, दत्तात्रेय साळूंके, रोहिदास डेरेंगे, किरण म्हस्के, बाळासाहेब औटी, भाउसाहेब आहेर, संतोष नवले आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही केले कौतुक-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदार लंके यांनी भेट घेतल्यानंतर कोरोना काळात मिळालेल्या पुरस्काराबददल आनंद व्यक्त केला. लंके यांनी कोरोना रूग्णांची सेवा करताना दिशादर्शक काम केले. त्यांची लंडनच्या संस्थेने दखल घेउन सन्मान केल्याबददल पवार यांनी आमदार लंके यांचे कौतुक केले.