अहमदनगर - सत्ता न मिळाल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे. आपले आमदार फुटू नयेत म्हणून नारायण राणेंपासून चंद्रकांतदादांपर्यंत सत्ताबदलाची भविष्यवाणी व्यक्त करत आहेत. मूळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेले भावी सहकाऱ्यांचे वक्तव्य हे भाजपासाठी नसून इतर एखाद्या जुन्या सहकाऱ्यांबद्दल होते, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी दिले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या विकासनिधीतून सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
'दानवे व्यासपीठावर असल्याने माध्यमांनी बाऊ केला'
मुख्यमंत्र्यांचे अनेक सहकारी आहेत. मात्र रावसाहेब दानवे व्यासपीठावर असल्याने पत्रकारांनी याविषयावर चर्चा केली, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. भाजपाने शिवसेनेला भरपूर त्रास दिलेला आहे. त्यामुळे किमान पुढची पंचवीस वर्षे शिवसेना युती करणार नाही. महाविकास आघाडी सरकार पुढची पंचवीस वर्षे टिकणार आहे आणि त्यातून नैराश्याने भाजपाचे नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत, असे मिटकरी यावेळी म्हणाले. नारायण राणे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकरांना भीती आहे की आपल्या तंबुतील आमदार फुटून जातील, म्हणून वारंवार सरकार बदलण्याची भविष्यवाणी ही नेतेमंडळी करत असतात, असा आरोप मिटकरी यांनी केला.
हेही वाचा -संजय राऊत यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार - चंद्रकांत पाटील