अहमदनगर - जामखेड पंचायत समितीच्या ठेकेदाराच्या हातपंप दुरुस्ती करणार्या गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलीला चिरडल्याची घटना घडली आहे. अनुजा गणेश कोल्हे, असे या मुलीचे नाव आहे. यात मुलीचा जागेवरच मृत्यू झाल्याने राजुरी परीसरात शोककळा पसरली आहे.
जामखेड तालुक्यातील राजुरी हे गाव शिर्डी-हैदराबाद महामार्गावर जामखेडपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. अनुजा ही आज दुपारी चार वाजता कोल्हेवस्तीवर रस्ता ओलांडत असताना तालुका पंचायत समितीची हातपंप दुरुस्तीची गाडी भरधाव वेगाने जामखेड कडे येत होती. याच वेळी या गाडीने चिमुरडीला चिरडले. अपघातानंतर चालक घाबरून पळून गेला.
जामखेड पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती टेम्पोने लहान मुलीला चिरडले. घटनेनंतर कोल्हेवस्तीवर एकच शोककळा पसरली. अनुजाला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिचा मृत्यू झाल्याने डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले व रात्री उशिरा राजुरी कोल्हेवस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जामखेड पंचायत समितीचा भोंगळ कारभार
सध्या पंचायत समितीमध्ये हातपंप दुरुस्तीच्या गाड्यांवर ठेकेदार पद्धतीने चालकाची भरती केलेली आहे. चालकाकडे हेवी लायसन्स गरजेचे आहे. त्यामुळे या अपघाताला पंचायत समिती जबाबदार असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. तसेच चालकावर ३०२ चा गुन्हा दाखल करवा, अशी नातेवाईकांनी मागणी केली आहे.