शिर्डी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातच राज्यात जनतेच्या मनातील आणि विकासाचा ध्यास घेवून काम करणारे सरकार स्थापन झाले आहे. हे राज्य आता माफीयांपासून आणि भ्रष्टाचारापासून वाचणार आहे. नव्या सरकारकडून फक्त आता जनतेचे हित लक्षात घेवूनच निर्णय होतील असा विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. निळवंडेचे पाणी डिसेंबर पर्यंत लाभक्षेत्रात देण्यासाठी आपला प्रयत्न असेल हे देखील त्यांनी स्पष्ट केले. लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.
विखे पुढे म्हणाले की सर्वसामान्यांसाठी आयुष्य खर्ची घालणे हाच उद्देश आहे.लोकांचे प्रश्न सोडवण्यात समाधान वाटते. जनतेचा विश्वास संपादन केल्यामुळेच सलग सात वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. पंतप्रधानांसह भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आपल्यावर विश्वास दाखवून पहिल्या क्रमांकावर शपथ घेण्याची संधी दिली. अनेक वर्षे मला सत्तेत काम करण्याची संधी मिळाली परंतू आजपर्यंत आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही किंवा मतदार संघातील जनतेला खाली मान घालावी लागेल असे कृतत्यही घडले नाही यामुळेच राज्यस्तरावर काम करण्याची मिळणारी संधी हा शिर्डी मतदार संघाचा गौरव आहे असे त्यांनी आवर्जुन सांगितले.
सर्वाधिक मंत्री जेल मध्ये जाण्याचा महाराष्ट्राचा रेकॉर्ड जनतेने नाकारलेल्या पक्षांनी सेनेला सोबत घेऊन सरकार बनवले, आता सर्वाधिक मंत्री जेल मध्ये जाण्याचा महाराष्ट्राचा रेकॉर्ड झाला आहे. अजूनही काही माजी मंत्री जेल मध्ये जाऊ शकतात. महाविकास आघाडीने महाराष्ट्राची लूट केली. सत्तेतील मंत्री बाहेर पडण्याची ही पहिली घटना आहे. मुख्यमंत्री असून घरात बसून कारभार केला. आमदारांची कामे होत नव्हती. जनतेच्या रोषामुळे ते बाहेर पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. फडणवीस हे प्रगल्भ नेते आहेत. राज्य गतिमान होण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारले.
मंत्रिमंडळ विस्ताराची विरोधकांनी चिंता करू नयेराज्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय झाला. मंत्रिमंडळ विस्ताराची विरोधकांनी चिंता करू नये. जिल्ह्यात तीन मंत्री असताना जिल्ह्यात कोणता प्रकल्प आला? फक्त वाळू उपसा प्रकल्प सुरू होता. अमृत महोत्सवी वर्षात राज्यात सरकार आले ही महत्त्वाची घटना आहे. मराठा,धनगर समाजाला आरक्षण देण्याचे काम सरकार करेल. इंधनाचे दर कमी केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या सरकारकडून लोकांना अपेक्षा आहेत.
बावीस किलोमीटरचे कालवे निळवंडेचे पाणी डिसेंबर पर्यंत देणारच असे सांगताना ते म्हणाले माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सहकार्यामुळे सुरुवातीच्या बावीस किलोमीटरचे कालवे होऊ शकले. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले.ज्यांना श्रेय घ्यायचे त्यांनी घ्यावे पण सत्य लोकांना माहीत आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भांडणे लावण्याचे काम सतत केले.हे सरकार योग्यवेळी आले आहे.आता महाराष्ट्र अधोगतीपासून वाचेल.लोणी ग्रामस्थांचे प्रेम आणि विश्वासाने मी भारावून गेलो आहे. जनतेचा सेवक म्हणून मी सदैव ऋणात राहील.
४५ वर्षे शेती प्रश्नावर रस्त्यावर पाशा पटेल म्हणाले, मी ४५ वर्षे शेती प्रश्नावर रस्त्यावर आहे. उत्पादन खर्चावर आधारित शेती मालाला भाव मिळावा ही आमची एकच मागणी आहे. विखे पाटील शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत.राज्यात कृषी मूल्य आयोग विखे पाटील यांच्यामुळे स्थापन झाला.त्यानी मला उपाध्यक्ष केले. नदीच्या काठावरील शेतीत बांबू लावा.आता बांबूपासून इथेनॉल बनवले जात आहे.शेतकऱ्यांचे हितासाठी महत्वाचे ठरेल.
मोदीजींचे नाव आणि फोटो वापरुन तुमचे खासदार निवडून आले - राष्ट्रवादी कॉंग्रेसच शिवसेनेला संपविणार हे फक्त मी सातत्याने सांगत होतो. काळाच्या ओघात घडलेही तसेच याची आठवन करुन देत खा.डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, मोदीजींचे नाव आणि फोटो वापरुन तुमचे खासदार निवडून आले. आता तुमच्यातून बाहेर पडलेल्या आमदारांचे तुम्ही राजीनामे मागणाऱ्यांनी खासदारांचे राजीनामे घेवून मोदींचा फोटो न वापरता निवडून येवून दाखवावे असे थेट आव्हान त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला दिले.