महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना संपलेला नाही; बाळासाहेब थोरात यांनी केले काळजी घेण्याचे आवाहन

दिवाळीनंतर देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat

By

Published : Nov 23, 2020, 4:49 PM IST

अहमदनगर - मागील 9 महिन्यांपासून संपूर्ण मानव जातीवर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले असून या काळात नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले. मात्र, लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर व दिवाळी काळात खरेदीसाठी झालेली गर्दी ही मोठी चिंताजनक बाब आहे. कोरोना संकट अद्याप संपलेले नसून प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. मागील नऊ महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे हतबल झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात सरकारला चांगले यश आले आहे. मात्र, सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे व वाढणार्‍या थंडीमुळे कोरोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात दिल्लीमध्येही कोरोनाची मोठी चिंताजनक परिस्थिती आहे, असेही थोरात म्हणाले.

स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबीयांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने शासनाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सचे पालन करावे. वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे. या त्रिसूत्रीचा वापर कोरोना रोखण्यासाठी महत्वाचा ठरणारा आहे. महाविकास आघाडी सरकारने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या योजनेअंतर्गत केलेल्या आरोग्य सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रात कोरोनापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही. काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या, शासनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details