शिर्डी (अहमदनगर)- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनीही या उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच, आजाराची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
राहाता व शिर्डी परिसरातील कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली साईसंस्थान सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासादर सदाशिव लोखंडे, आ.सुधीर तांबे, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, यावेळी उपस्थित होते.