अहमदनगर -जिल्ह्यात सहकार चळवळ उभारणीत महत्वाचा वाटा असणाऱ्या शिलेदारांपैकी एक असलेल्या स्व.शंकररावजी कोल्हे यांचे जिवनकार्य दिशादर्शक ठरले आहे. सरपंच ते मंत्री या त्यांच्या राजकीय जिवन प्रवासात त्यांनी सहकार, समाजकारण, कृषी, शिक्षण या क्षेत्रात ही महत्वपूर्ण योगदान दिले. शिस्तप्रिय व अभ्यासू स्वभाव हे वैशिष्ट असलेले ज्येष्ठ नेते स्व.शंकरराव कोल्हे यांनी जिल्हा बँक व जिल्ह्याच्या विकासासाठी कायम साथ दिली. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याची मोठी हानी झाली असून राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व हरपले, अशी भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
'सहकार व शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक हरपले'
सहकारातून सर्व सामान्यांच्या जीवनात नवी पहाट फुलवितांना शिक्षणातून समाजाचा विकास करण्याचे कार्य स्व. शंकररावजी कोल्हे यांनी आयुष्यभर केले. त्यांनी सहा वेळा कोपरगांव मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले असून संजीवनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण करुन दिली. 9 वर्ष साई संस्थानचे उपाध्यक्ष म्हणून योगदान ही दिले. आधुनिक विचारांची जाण असलेले कोल्हे यांच्या निधनाने सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले, असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केली.