अहमदनगर - कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. तो कोणत्याही रुपाने मानवी शरीरात प्रवेश करतो. दुसर्या लाटेनंतर लॉकडाऊनची निर्बंध शिथिल झाले असले तरी कोणीही निष्काळजीपणा करू नका, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे तालुका व शहरातील कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, जि. प. सभापती मिराताई शेटे, उपसभापती नवनाथ आरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. संदीप कचोरिया, डॉ. राजकुमार ज-हाड, डॉ. सुरेश घोलप, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर होणारी गर्दी अत्यंत चिंताजनक
यावेळी थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून कोरोनाची रुग्ण वाढ कमी होते आहे हे आनंददायी आहे. मात्र लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर होणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही शास्त्रज्ञच्या मते तिसरी लाट येऊ शकते म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करणे केले पाहिजे. कोणाला लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घ्या. लक्षणे असणार्यांचे विलगीकरण करा. ट्रेसिंग, टेस्टिंग, आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करून जास्तीत जास्त गावे पूर्ण मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. संगमनेर तालुक्यात सध्या 81 गावे कोरोना मुक्त झाली असून संपूर्ण तालुका लवकरात लवकर कोरोना मुक्त करण्यासाठी योगदान दयावे. सर्वांनी निर्बंध शिथिल झाले असले तरी अत्यंत काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.