अहमदनगर - राज्यात घडणाऱ्या घटनांचा तपास महाराष्ट्र पोलिसांनीच करायला हवा आणि तो अधिकार राज्य सरकारचा आहे, तो राज्य सरकारकडेच असावा, असे आमचे ठाम मत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यास खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सहमती दिल्याने आता शरद पवारांनीच मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना बाळासाहेब थोरातांनी हे वक्तव्य केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेविषयी भाजप राजकारण करण्याचा तसेच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्या घटनेबाबत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला असल्याने त्याविषयी आणखी खुलासा करण्याची गरज नसल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. हेही वाचा -प्रेमविवाह न करण्याच्या 'त्या' शपथेवर पंकजा मुंडेंना संताप; म्हणाल्या...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विश्वसंवाद केंद्रातर्फे आयोजित ‘नोइंग आरएसएस’ या कार्यक्रमास जाण्यावरून गुरुवारी वाद निर्माण झाला होता. त्यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, 'आरएसएस' नेहमीच कुठे ना कुठे आपला प्रचार करण्यासाठी प्रयत्न करत असते, मात्र विद्येचे माहेरघर असलेल्या ठिकाणी तरी हे नसावे, तिथे राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या तत्वज्ञानाचा विचार व्हावा, चर्चा व्हावी हे आमचे मत असून पुणे विद्यापीठात आरएसएसच्या प्रचाराचा प्रकार होऊ नये.
हेही वाचा -एल्गार परिषदेचा तपास अखेर 'एनआयए'कडे, पुणे न्यायालयाचा आदेश