अहमदनगर- काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे हे पद सद्यस्थितीत रिक्त आहे. एक मार्चपूर्वी, विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याआधी महाविकास आघाडीत चर्चा होऊन, हे पद पुन्हा काँग्रेस पक्षाकडे असेल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना थोरात यांनी सांगितले की, 'हे पद पूर्वी काँग्रेस पक्षाकडे होते आणि यापुढेही राहिल यात कसलीही अडचण नाही. येत्या एक मार्चपूर्वी अर्थात विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याआधी महाविकास आघाडीत याबाबत चर्चा केली जाईल. यात हे पद काँग्रेसकडेच राहिल.'
बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची माळ नाना पटोले यांच्या गळ्यात पडली. आता थोरात यांच्या नावाची चर्चा उपमुख्यमंत्रीपदासाठी होत आहे. याबाबत थोरात यांना विचारले असता, त्यांनी उपमुख्यमंत्रीपदी आपल्या नावाची चर्चा ही मीडियात आहे. मात्र याबाबत आमच्यात कसलीही चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण दिले.