अहमदनगर - दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालव्यांच्या कामांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत गती दिली असून डाव्या कालव्याच्या 64 ते 70 किलोमीटर लांबीच्या कामाची पाहणी आज महसूल मंत्री थोरात यांनी केली. संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर, काथरवाडी, लोहारे मेंढवण या परिसरात विविध ठिकाणची पाहणी करत त्यांनी कामाचा आढावा घेतला. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, जि.प. सदस्य महेंद्र गोडगे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, भारत शेठ मुंगसे, बेबीताई थोरात, बाबजी कांदळकर, सचिन दिघे, सोपान जोंधळे, बाळासाहेब गायकवाड, रावसाहेब दिघे ,रमेश दिघे संपत काळे, निखिल पापडेजा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक कार्यकारी अभियंता गिरीश संघांनी, विवेक लव्हाट, उपकार्यकारी अभियंता प्रमोद माने, अधिकारी डॉ. शशिकांत मंगळरूळे, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.
दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास
याप्रसंगी थोरात म्हणाले की, निळवंडे धरण पूर्ण करून या दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. 2022 मधील पावसाळ्यात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे या भागाला देण्यासाठी पूर्ण प्रयत्न असून त्यादृष्टीने काम अत्यंत वेगात सुरू आहे. 2014 पर्यंत धरण पूर्ण करून कवठे कमळेश्वर, पिंपळगाव कोझिंरा, गणेश वाडी हे मोठे बोगदे मार्गी लावले. मात्र मागील पाच वर्षात काम थांबले होते.