अहमदनगर - 1992 पासून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक दिलाने नगरपरिषदेत काम होत असल्याने विकासाची पायाभरणी झाली आहे. थेट पाईपलाईन योजना, रस्ते, विविध बागा, हायटेक बसस्थानक, विविध वैभवशाली इमारती, शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण यांसह सामाजिक सलोखा व सुरक्षितता यामुळे संगमनेर शहराचा राज्यात लौकिक निर्माण झाला असून सततच्या विकास कामांतून संगमनेर शहराची विकासातून वैभवाकडे वाटचाल होत असल्याचे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
संगमनेर नगर परिषदेच्या वतीने प्रभाग 1 ते 14 मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, बंदिस्त गटारे, ट्रीमिक्स काँक्रिटीकरण, आमदार डॉ. सुधीर तांबे शॉपिंग शॉपिंग कॉम्प्लेक्स यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.
संगमनेर शहर व तालुक्यासाठी सातत्याने मोठा निधी दिला
याप्रसंगी थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर कोरोना संकट, निसर्ग व तौकते चक्रीवादळ असे विविध संकटे आली अशा संकटातही या सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला असून संगमनेर शहर व तालुक्यासाठी सातत्याने मोठा निधी दिला आहे. 1992 पासून संगमनेर नगरपालिकेत एक दिलाने काम होत असल्याने विकासाच्या अनेक योजना मार्गी लागल्या आहेत. संगमनेर शहरात विविध गार्डन, चांगले रस्ते, अद्यावत इमारती, हायटेक बस स्थानक, बायपास, प्रवरा नदीवर विविध पूल, क्रीडा संकुल असे अनेक मोठमोठी विकासकामे मार्गी लागली आहेत. यामधूनच शहराच्या विकासाची खरी पायाभरणी झाली आहे. यामध्ये अनेक माजी पदाधिकारी यांचेही मोठे योगदान आहे. संगमनेर शहरासाठी सुमारे दीडशे कोटींच्या निधीतून नव्याने विविध रस्ते, बंदिस्त गटारे, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाचे बंदिस्तकरण, असे विविध कामे होणार आहे. ही सर्व कामे उच्च व चांगल्या दर्जाची करताना शहराच्या वैभवात आणखी भर पडेल यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. चांगल्या वातावरणामुळे संगमनेर शांतता व सुरक्षित असलेले शहर म्हणून राज्यात ओळखले जात आहे.
निळवंडे कालव्यांच्या कामाला गती दिली
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आपण दुसर्या दिवशी निळवंडे कालव्यांच्या कामाला गती दिली. येत्या 2022 मध्ये पावसाळ्यातील पाणी कालव्यांद्वारे दुष्काळी भागाला देण्याचा आपला मानस आहे. संकटे आली नसती तर अजूनही मोठा निधी मिळवता आला असता. काम होत राहतील विकासातून शहर वैभवाकडे जात आहे. या सर्वांचा अभिमान आपण सदैव बाळगला पाहिजे, असेही ते म्हणाले.