अहमदनगर -ट्विटर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले समाजमाध्यम आहे. सत्तेच्या दबावाला बळी पडून ट्विटरने आपल्या भूमिका ठरवू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला जे विचार स्वातंत्र्य दिले आहे त्याची ही मुस्कटदाबी आहे, असे म्हणत ट्विटरच्या कारवाईचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निषेध केला. त्याचबरोबर, लोकशाहीच्या हितासाठी आवाज उठवत राहू, लढू आणि संघर्ष करू, असे देखील ते म्हणाले.
हेही वाचा -मंदिर खुले करण्यासाठी भाजयुमो करणार साकडं फेरी आंदोलन, सचिन तांबे यांची माहिती
ट्विटरच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, माझे ट्विटर हँडल लॉक करण्यात आले. कारण काय तर म्हणे, राहुल गांधीजी यांना समर्थन करणारे ट्विट केले म्हणून..! मुळात राहुल गांधी हे लढवय्ये नेते आहेत. निडर होऊन ते सामान्य जनतेसोबत उभे राहतात, त्यांचा आवाज बनतात. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. खरेतर ट्विटर हे समाजमाध्यम आहे, तेथे आपण आपले मत मांडू शकतो. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आम्हाला मिळालेला आहे. आमचे नेते राहुल गांधी आणि आम्ही काँग्रेसजन ट्विटरच्या माध्यमातून जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर आवाज उठवत होतो.
ट्विटरने काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचे अकाऊंट लॉक केले, त्याचबरोबर अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचेही ट्विटर हँडल लॉक केले. आम्ही देशविघातक, धार्मिक द्वेष वाढविणारे किंवा जातीय तेढ निर्माण करणारी मते मांडलेली नाहीत. एका पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हा काय गुन्हा आहे का? असा सवालही थोरात यांनी विचारला.
हेही वाचा -मंदिर खुले करण्यासाठी भाजयुमो करणार साकडं फेरी आंदोलन, सचिन तांबे यांची माहिती