अहमदनगर- महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना गेला म्हणून.. पण झाले काय, आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
अहमदनगर इथे प्रहार जनशक्तीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची त्यांनी पाहणी करून कार्यकर्ते, रुग्ण, नातेवाईक यांच्याकडून अडीअडचणींची माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील आणि त्यात महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना संसर्गावर बोलताना मोदींवर टीका केली. देशात वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे. ऑक्सिजन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाहीत. म्हणजे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही. उलट ते जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना हद्दपार झाला आहे.
राज्यात ऑक्सिजनचे प्लांट उभे रहात आहेत-
राज्याला केंद्राकडून गरजेपेक्षा कमी ऑक्सिजन मिळत आहे. मात्र, राज्याने याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पावले उचलली असून काही ऑक्सिजन प्लांट सुरू झाले असून काही लवकरच सुरू होतील. राज्यात साखर कारखाने, खासगी उद्योजकांना यासाठी सवलती देऊन ऑक्सिजन प्लांट उभे राहत आहेत, अशी माहिती कडू यांनी दिली.