महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर मी भाजपमध्ये प्रवेश करणार, नगरमध्ये मंत्री बच्चू कडूंचे खळबळजनक वक्तव्य - बच्चू कडू भाजपमध्ये प्रवेश करणार

अहमदनगरमध्ये जलसंपदा कार्यालयात दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय मदत केंद्राचे उद्घाटन कडू यांच्या हस्ते आज बुधवारी करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना कडू यांनी हा पवित्रा घेतला.

अहमदनगर
अहमदनगर

By

Published : Nov 11, 2020, 6:58 PM IST

अहमदनगर- केंद्र सरकारने शेतीविषयक केलेल्या कायद्यात फक्त दोन ओळींचा बदल करून शेतमालाला खर्चाच्या पन्नास टक्के नफा धरून हमीभाव दिला आणि त्यानुसार शेतमाल खरेदी करण्याची हमी दिली तर आपण आता भाजपमध्ये प्रवेश करू, असे खळबळजनक वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. अहमदनगरमध्ये जलसंपदा कार्यालयात दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय मदत केंद्राचे उद्घाटन कडू यांच्या हस्ते आज बुधवारी करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना कडू यांनी हा पवित्रा घेतला.

बोलताना मंत्री बच्चू कडू

केंद्राने शेतकरीविषयक केलेल्या नवीन कायद्यांबाबत देशभर विशेषतः पंजाब-हरियाणा याठिकाणी आंदोलने सुरू असून त्याची व्याप्ती आता वाढत आहे. राज्यामध्येही ट्रॅक्टर रॅली काढून या कायद्याला विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना विचारले असता त्यांनी केंद्र सरकारच्या कायद्यावर टीका करताना, त्यातील त्रुटी पुढे आणल्या. उद्योजकांचे तुम्ही भले पाहत असताना शेतकऱ्यांना सुद्धा खर्चाच्यावर पन्नास टक्के वाढीवभावाची हमी मिळाली पाहिजे आणि हा सर्व शेतमाल सरकार विकत घेईल, अशी हमी दिली तर या कायद्याचे स्वागत करून आपण भाजपमध्ये प्रवेश करू, असे ते म्हणाले.

मंत्री असल्याने कामे होतायेत म्हणून शांत आहे -

बच्चू कडू हे आक्रमक राजकारण आणि आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, मंत्रिपद भेटल्यापासून त्यांच्यातील आक्रमकता आता दिसत नाही, यावर पत्रकारांनी छेडले असता कडू यांनी मिश्किल उत्तर देत मंत्री असताना आता काय हातात दंडुका घेऊ का? असे म्हणत मंत्रीपद असल्याने अनेक कामे मार्गी लागत आहेत. कार्यकर्ते, दिन-दुबळे, दिव्यांग यांच्या प्रश्नावर मंत्री म्हणून अधिकाऱ्यांना सूचना देऊन कामे होत असल्याने आंदोलन करण्याची सध्या गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आपल्यातील आक्रमक कार्यकर्ता जिवंत असून 'जब तक है हम, तब तक है दम' असा डायलॉग मारायला पण ते विसरले नाहीत. आपल्यातील आक्रमकता मरेपर्यंत कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details