शिर्डी- साईबाबा संस्थानच्यावतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना वैद्यकीय मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या २० जणांच्या वैद्यकीय पथकाने सुमारे १ हजार ५०० पूरग्रस्त नागरिकांवर उपचार केले. तसेच सुमारे १० लाख रुपयांची मोफत औषधे वाटल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. हे वैद्यकीय पथक पुन्हा शिर्डीत परतले आहे.
पूरग्रस्त भागात गेलेले साई संस्थानचे वैद्यकीय पथक परतले; अनेकांवर केले उपचार साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे व विश्वस्त मंडळाच्यावतीने पूरग्रस्थांच्या वैद्यकीय मदतीसाठी १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत एक फिरते वैद्यकीय वाहन (अॅम्ब्युलन्स) व एक बस पाठवण्यात आली होती. यासोबत २० जणांचे वैद्यकीय पथकासह औषधे पाठवण्यात आले होते. या पथकाने तीन दिवस वैद्यकीय सेवा दिली आहे.
मौजे वळीवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, मौजे बहे, मौजे कोळे, मौजे नरसिंगपूर (तालुका वाळवा, जिल्हा सांगली) येथे जावून सुमारे १ हजार ५०० जणांवर उपचार करुन या दरम्यान आवश्यकतेनुसार सुमारे १० लाख रुपयांच्या मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. दक्षिण कोल्हापूरचे आमदार अमल महाडिक यांनी श्री साईबाबा संस्थानचे आभार मानले असून वैद्यकीय पथकाने केलेल्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १० कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश नुकताच सुपूर्त करण्यात आलेला आहे. याबरोबरच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पूरग्रस्तांच्या प्रकृतीला होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये निर्जंतुकीकरण करणे तसेच शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी रासायनिक द्रव्ये इत्यादीचा वापर करणे, फवारणी करणे इत्यादी कामांसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर व सांगली यांना प्रत्येकी १ कोटी रुपये असा २ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वर्ग करण्यात आला असल्याचेही मुगळीकर यांनी सांगितले.
या वैद्यकीय पथकास प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे, वैद्यकीय प्रशासक डॉ.प्रितम वडगावे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.