महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात लवकरच होणार टाळेबंदीची घोषणा, महसुलमंत्र्यांचे संकेत - टाळेबंदी बातमी

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. 10 एप्रिल) सायंकाळी सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. मानवतेसाठी, त्यांचे जीव वाचवण्यासाठी कटू असले तरीही असे निर्णय घ्यावे लागतील, असे सांगत त्यांनी राज्यात लवकरच टाळेबंदीची घोषणा होणार असल्याचे स्पष्ट संकेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

बैठकचे छायाचित्र
बैठकचे छायाचित्र

By

Published : Apr 10, 2021, 5:38 PM IST

अहमदनगर -महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. 10 एप्रिल) सायंकाळी सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आज सकाळी संगमनेरात आढावा बैठक घेवून तालुक्यातील कोविडस्थिती आणि उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले, गेल्या वर्षी टाळेबंदीत सामान्य माणसांसह छोट्या व्यापार्‍यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, मानवतेसाठी, त्यांचे जीव वाचवण्यासाठी कटू असले तरीही असे निर्णय घ्यावे लागतील, असे सांगत त्यांनी राज्यात लवकरच टाळेबंदीची घोषणा होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

बोलताना महसूल मंत्री

राज्यात सर्वाधीक प्रादुर्भाव होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहमदनगरचाही समावेश आहे. त्यातही जिल्ह्यातील अहमदनगर, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांची अवस्था अत्यंत बिकट असून अहमदनगर महापालिका क्षेत्रात सरासरी दररोज साडेपाचशेहून अधिक नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ होत आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांची स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. यावरुन राज्यातील सध्याची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे दिसून येते.

राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्र वगळता 30 एप्रिलपर्यंत राज्यात विकेंड लॉकडाऊन सुरू आहे. मागील दहा दिवसांचा विचार करता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागण्यापूर्वीच्या 1 ते 5 एप्रिल या पहिल्या पाच दिवसांत जिल्ह्यात 8 हजार 574 तर संगमनेर तालुक्यात पाचशे रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध लागले. मात्र, त्याचा कोणताही परिणाम रुग्णांवर झाल्याचे गेल्या पाच दिवसांत दिसून आले नाही.

महसूल मंत्री बाळासहेब थोरात यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी आज प्रशासकीय भवनात अधिकार्‍यांची आढावा बैठक बोलावली. यावेळी त्यांनी संगमनेरच्या आरोग्य स्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा, प्राधान्यक्रमाने आवश्यकता आदींची माहिती घेतल्यानंतर त्यांनी आमदार निधीतील अखर्चित 30 लाख रुपयांचा निधी आरोग्य सेवा सुधारणांसाठी लवकरात लवकर वापरण्याच्या सूचना दिल्या. रेमडेसिवीर लसीच्या तुटवड्याबाबत त्यांनी ही लस कोणत्या टप्प्यावरील रुग्णांना वापरावी, याबाबत नेमके निकष ठरलेले नसल्याने त्याचा सर्रास वापर होत असल्याकडे लक्ष वेधले. त्यासाठी लवकरच नियमावली समोर येईल असेही ते म्हणाले. जिल्ह्याचीच नाहीतर राज्यातील कोविड स्थिती गंभीर वळणावर आहे. सरकार या संकटाचा सामना करत आहे. लोकांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, लोकांचे जीव वाचले पाहिजे याला सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्या अनुषंगाने काही कटू निर्णय घ्यावे लागतील, असे सांगतांना त्यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना एकप्रकारे पाठबळच दिले.

हेही वाचा -लॉकडाऊनला विरोध करत व्यापाऱ्यांचे अनोखे कायदेपालन आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details