अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वरिष्ठ पत्रकार बाळ बोठे याला आज (रविवारी) पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची (20 मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आज नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बोठेला अटक केल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्याच्याकडे एक चिठ्ठी सापडल्याची माहिती दिली.
पारनेर न्यायालयाने सुनावली बोठेला पोलीस कोठडी- जो बाळ बोठे नगर जिल्ह्याच्या पत्रकारिते एक गुन्हे वार्ताहर म्हणून नावारूपास आला, ज्याने अनेक गुन्ह्यांच्या बातम्यांचे वृत्तांकन केले, अनेक गुन्हेगारांचा खुलासा करत नाव कमावले त्याच बाळ बोठेला आज स्वतः एक आरोपी आणि तेही एका निर्घृण खून प्रकरणात मास्टरमाइंड म्हणून न्यायालयासमोर उभे राहावे लागले. काल(शनिवारी) त्याला हैदराबादमध्ये अटक करून पारनेर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. आज (रविवारी) त्याला पारनेर न्यायालयात पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यात हजर केले, यावेळी तपासकामी पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी मागितली असता न्यायालयाने ती मान्य करत सात दिवसांची (20 मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली.
बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट-
बाळ बोठे हैद्राबादमध्ये ज्या लॉजमध्ये लपून बसला होता, तेथे त्याने आपल्या रूमला बाहेरून कुलूप लावून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून दरवाजा उघडला आणि बोठेला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची अंगझडतीत त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली ज्यात आपला नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास खालील क्रमांकांवर संपर्क करून माहिती कळवावी, असे लिहले होते. तो आत्महत्येच्या तयारीत असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये असल्याचा खुलासा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत केला.
आरोपीला सुरक्षित आणण्यासाठी फॉरच्युनर कारचा वापर-
बोठे हैद्राबादमध्ये ज्या बिलालनगर इथे लपला होता, तो भाग संवेदनशील आणि अटक करण्याच्या दृष्टीने जिकिरीचा होता. तसेच त्याला हैद्राबादमधील एक महिला, एक वकील मदत करत होते. त्यामुळे पोलिसांची एकूण सहा पथके त्याच्या अटकेसाठी काम करत होती. बोठेचा चाणाक्षपणा, ओळखी, आणि गुन्हेगार स्वरूपाच्या लोकांकडून हैदराबादमध्ये मिळत असलेली मदत पाहता महाराष्ट्र पोलिसांनी तपासकामी स्थानिक पातळीवर फॉरच्युनर कार भाड्याने घेत तिचा तपासकामी वापर केल्याचे पोलीस अधीक्षकांनी आज सांगितले. तसेच त्याला अटक केल्यानंतर नगरकडे आणताना कुठल्याही प्रकारचा घातपात होऊ नये, म्हणून पोलिसांनी फॉरच्युनर कारचा वापर केला, त्यात बोठेची बडदास्त ठेवण्याचा उद्देश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस ठाणे ते न्यायालय, बोठेची पायी वरात!!
पारनेर पोलीस ठाणे ते पारनेर न्यायालयापर्यंत पोलिसांनी मास्टरमाइंड आरोपी बाळ बोठेला पाई चालत नेले. मात्र, यावेळी अनेक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्याला गराडा होता. वास्तविक पारनेर पोलीस ठाणे ते पारनेर न्यायालयाचे अंतर नजीकचे आहेत, तसेच या ठिकाणी जाण्यास रस्ता अपुरा असल्याने बहुतांशी आरोपींना पोलीस पायीच न्यायालयापर्यंत घेऊन जातात. त्यामुळे बोठेला पण पायीच नेल्याचे बोलले जाते. मात्र, यामुळे पारनेरमधील नागरिकांनी उत्सुकतेने या ठिकाणी येत बोठेची पायी वरात पाहिली.