अहमदनगर -राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करणार असल्याचे भाजप नेते अशोक भांगरे यांनी म्हटले आहे. मंत्रीपदाचा उपभोग घेतलेल्या माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या विरोधात अकोले येथे जनआक्रोश आंदोलन करणार आहोत. अकोले शहरातील बाजारतळावर आंदोलनास प्रारंभ होईल, अशी माहिती भांगरे यांनी दिली.
पिचडांनी गरीब असलेल्या आदिवासी समाजाची लूट केली - अशोक भांगरे
मधुकर पिचड यांच्या दुसऱ्या पत्नी व आमदार वैभव पिचड यांच्या सावत्र आई कमल देशमुख-पिचड या मराठा समाजाच्या आहेत. परंतु पिचड यांनी मंत्रीपद व राजकीय शक्तीचा वापर करून त्या आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळविला. त्यातून त्यांनी गरीब असलेल्या आदिवासी समाजाची लूट केली आहे. त्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यातून आदिवासींना फसविल्याबद्दल पिचड यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते भांगरे यांनी केली आहे.
आदिवासी असल्याबाबत खोटा दाखला मिळविल्यानंतर त्याचा वापर करुन पिचड यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता देखील बळकावली असल्याचा आरोप भांगरे यांनी केला आहे. याचा निषेध म्हणून अकोले येथील आदिवासी कृती समितीद्वारे अकोले शहरात पिचड यांच्या बिगर आदिवासी पत्नीकडे असलेल्या दाखल्यांच्या प्रतींचे वाटप केले जाणार आहे. आदिवासी कृती समितीतर्फे हे आंदोलन पुकारण्यात आले असून, समितीचे सदस्य व समाजातील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, असे भांगरे यावेळी म्हणाले.