अहमदनगर- शिर्डीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची आज मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे. साईबाबांना आपले गुरु मानणारे लाखो भक्त आज शिर्डीत बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आज प्रत्येक भक्त स्वत:ला धन्य मानत आहे.
तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला १९०८ साली साईबाबांच्या अनुमतीने सुरू करण्यात आले होते. साईबाबांचे परमभक्त तात्यासाहेब नुलकर व तात्या कोते पाटील तसेच काही भक्तांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरु मानून त्यांची पूजा केली होती. त्यावेळीपासून शिर्डीमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या उत्सवाला सुरुवात झाली. आज सकाळच्या काकड आरतीनंतर साईंची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरित ग्रंथांची मिरवणूक साई मंदिरापासून ते साईंच्या व्दारकामाई मंदिरापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर व्दारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन मिरवणुकीला गुरूस्थान मंदिराच्या मार्ग समाधी मंदिरात आणण्यात आले. आणि त्यानंतर आजच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली.