अहमदनगर - लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र चिंचा फोडण्याच्या कामामुळे महिलांना घरात बसून हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. लॉकडाऊनमध्ये आंबट असलेली चिंच अनेकांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करत असल्याचे चित्र सध्या कोपरगावातील काही भागात पाहावयास मिळत आहे.
7 किलो चिंचोक्याला 125 रुपये मजुरी
या व्यवसायात व्यापारी शेतकऱ्यांकडून चिंचेचे झाड उकते विकत घेतले जाते. दोन ते चार मजूर घेऊन बांबूच्या सहाय्याने चिंचा झाडावरून पाडल्या जातात. त्या चिंचा गोळा करून पोत्यात भरून वजन करुन फोडणार्या महिलांकडे दिल्या जातात. या महिला चिंच, चिंचोका, टरफल, प्रतवारी करून देतात. चिंचेला प्रतवारीनुसार लिलावात योग्य दर मिळतो. चिंचा फोडून टरफल, चिंचोका, साल व फोडलेली चिंच वेगळी केली जाते. ती पुन्हा वजन करून व्यापाऱ्याला देतात. व्यापारी चिंचोक्यांचे वजन करुन घेऊन त्यानुसार महिलांना मोबदला देतात. सात किलो चिंचोक्यांचे वजन भरल्यास महिलांना 125 रुपये मजुरी मिळते.