महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; घटनेपूर्वी केला व्हिडिओ - आत्महत्या

श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतः त्याच्यावर झालेला अन्याय मांडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

By

Published : Jun 10, 2019, 7:34 AM IST

Updated : Jun 10, 2019, 9:34 AM IST

अहमदनगर- श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी व्यावसायिकाने स्वतः त्याच्यावर झालेला अन्याय मांडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रभाकर उर्फ बाळासाहेब कर्नाटकी असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

भाजप नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

श्रीरामपूर नगरपालिकेच्या जागेवर टपरी टाकत मागील ३० वर्षांपासून प्रभाकर उर्फ बाळासाहेब कर्नाटकी हे व्यवसाय करत होते. मात्र, ज्या जागेवर त्यांचे दुकान होते त्याठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून शॉपिंग सेंटर बांधण्यात आले. हे शॉपिंग सेंटर तेथे असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना गाळे म्हणून दिले जाणार होते. कर्नाटकी यांनाही गाळा दिला जाईल, असे नगरसेवक रवी पाटील यांनी सांगितले होते. तेथील दोन गाळे या नगरसेवकाने आपल्या भावाला दिले होते. मात्र, नंतर कर्नाटकी यांना गाळा देण्यास रवी पाटील यांनी नकार दिला. तसेच त्यांना वेळोवेळी शिविगाळ करून अपमानित केले. त्यामुळेच कर्नाटकी यांनी त्यांना मिळणाऱ्या गाळ्यातच गळफास घेणार, असे आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

सर्वसामान्य असलेले कर्नाटकी यांच्या बाजूने कोणीही नसल्याने ते अनेक दिवसांपासून खचून गेले होते. आता आपल्याला कोणीही मदत करत नाही. या राजकारण्यांपुढे आपला टिकाव लागणार नाही, अशी त्यांची मानसिकता झाली होती. यातूनच निराश झालेल्या कर्नाटकी यांनी आत्महत्या केली. भाजपप्रणीत महाआघाडीचा हा रवी पाटील नगरसेवक असून श्रीरामपूर नगरपालिकेत महाआघाडीच्या अनुराधा आदीक नगराध्यक्ष आहेत.

मृत प्रभाकर कर्नाटकी यांच्या मुलीच्या तक्रारीनुसार, श्रीरामपूर पोलिसांनी भाजप नगरसेवक रवी पाटीलविरोधात कर्नाटकी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नगरसेवक रवी पाटील फरार झाला असून पुढील तापस श्रीरामपूर पोलीस करत आहेत. एका सर्वसामान्य माणसाला नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवण्याच्या या घटनेनंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Last Updated : Jun 10, 2019, 9:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details