अहमदनगर - शिर्डीत नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली असतानाच या गर्दीचा फायदा घेत एका अज्ञाताने मतिमंद मुलीला साई मंदिराच्या 1 नंबर गेटवर सोडून दिल्याचे समोर आले आहे. ही घटना साई संस्थानच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.
मतिमंद मुलीला साई मंदिराजवळ सोडून अज्ञात व्यक्ती पसार
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. याच गर्दीचा फायदा उचलत एक अज्ञाताने आपल्या मतिमंद मुलीला साई मंदिराच्या 1 नंबर गेटवर सोडून दिल्याचा प्रकार आता उघड झाला आहे. ही व्यक्ती मतिमंद मुलीला साई मंदिराच्या 4 नंबर गेट समोरील अहमदनगर-मनमाड महामार्गावरून घेऊन जात असल्याचे साई संस्थानच्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. मात्र, साईबाबा मंदिराच्या 1 नंबर गेटवर ही मतिमंद मुलगी एकटी गर्दीत फिरत आणि रडत असल्याने या मुलीला काही भाविकांनी साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकांकडे सोपवले. साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी मुलीचा नातेवाईकांचा शोध सुरू केला. मात्र, अनेक तास उलटून गेले असले तरी मुलीचे नातेवाईक मिळून आले नसल्याने अखेर साईबाबा संस्थांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या मतिमंद मुलीला शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.