अहमदनगर- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०१९ अंतर्गत नाशिक विभागात ७ लाख ५३ हजार १०३ शेतकर्यांना ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती नाशिक महसुल विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिली. तर अहमदनगर जिल्ह्यात २ लाख ५८ हजार ७८७ शेतकर्यांना २ हजार २९६ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे अहमदनगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितलं. सध्या दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
सोमवारी नगरच्या राहुरी आणि नगर तालुक्यातील जखणगाव येथील शेतकर्यांच्या याद्या प्रातिनिधीक स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आल्या. या यादीनुसार शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु करण्यात आले. दिनांक २८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्वच गावात याद्यांची प्रसिद्धी होऊन आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे.