शिर्डी (अहमदनगर) -आज (दि. 11 मार्च) देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून साईबाबांच्या शिर्डीतही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांनी आपल्या हयातीत भाविकांना अनेक रूपात दर्शन दिले असल्याने आज महाशिवरात्री निमित्ताने हजारो भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहे.
आज महाशिवरात्री असल्याने साईबाबांच्या समाधीवर महादेव यांच्या प्रतिमा ठेवण्यात आली असून आज साईभक्त साईबाबांचे दर्शन घेत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आज महाशिवरात्री निमित्ताने उपवास असल्याच लक्षात घेता साई संस्थानच्या वतीने साई प्रसादलयात साबुदाणा, शेंगदाणे आणि वनस्पती तुपापासुन तब्बल 70 क्विंटल साबुदाण्याची खिचडी तसेच झिरके बनवण्यात आले असून साईभक्त मोठ्या आनंदाने खिचडीचा आस्वाद घेत आहेत.
शिर्डी साईबाबांचा साई प्रसादलयात भाविकांना दररोज भात, वरण, चपाती, भाजी तसेच मिठाई साई प्रसाद म्हणून साई संस्थानकडून मोफत दिला जाते. मात्र ,ज्यावेळी आषाढी एकादशी, महाशिवरात्री असते त्यावेळी भाविकांना उपवास असल्याने साई संस्थानकडून साई प्रसादलयात साबुदाणा खिचडी व झिरके साई प्रसाद म्हणून दिला जात आहे. दररोज 60 ते 70 हजार भाविक साईबाबांच्या साई प्रसादलयातील प्रसादाचा लाभ घेत असतात. मात्र, कोरोनाचा पार्श्वभूमीवर साई संस्थानकडून लावण्यात आलेले निर्बंधामुळे यंदाचा वर्षी भाविकांची संख्या घटली असल्याचे पहायला मिळत आहे.