अहमदनगर- कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब मजुरांचे रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या संकल्पनेतील 'न्याय' या योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबीयांना सहा हजार रुपये प्रतिमहिना अशी रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली. या योजनेंतर्गत प्रतिदिनी 200 रुपये प्रमाणे प्रतिकात्मक वाटप आज करण्यात आले.
राज्यातील 29 हजार गरीब कुटुंबांना प्रतिदिन 200 रुपयाचे प्रतिकात्मक वाटप - सत्यजीत तांबे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या 29व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संगमनेर येथे युवक काँग्रेसच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'न्याय' या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबीयांना दोनशे रुपये प्रतिदिनाचे प्रतिकात्मक वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा, नगरसेवक नितीन अभंग, गौरव डोंगरे, विजय उदावंत, विशाल वालझाडे, मुश्ताक शेख आदी उपस्थित होते.
यावेळी सत्यजित तांबे म्हणाले, की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये गोरगरीबांसाठीच्या न्याय योजनेनुसार 1 लाख 44 हजार पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व कुटुंबांना दरमहा 6000 रुपये म्हणजे प्रतिदिन 200 रुपये बँक खात्यात जमा करण्याची योजना आणली होती. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कामे बंद आहेत. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची वेळ आली आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब, मजूर, रोजंदारी कामगार, बारा बलुतेदार , छोटे शेतकरी अशा लोकांची खूप वाईट अवस्था झाली आहे. केंद्र सरकारने पॅकेजच्या घोषणा केल्या, पण त्यांचा गरीबांना किती व कधी लाभ होणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणून देशातील व राज्यातील गरीबांना अशा संकटात तातडीने मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारने प्रतिमहिना 6000 रुपये किमान पुढील सहा महिने तरी द्यावेत. म्हणजे त्या कुटुंबाला थोडासा हातभार लागेल. भलेही केंद्र शासनाने या न्याय योजनेचे नाव बदलले तरी चालेल, पण ही मदत करणे अत्यंत गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील 29 हजार गरीब कुटुंबांना प्रतिदिन 200 रुपये असे रोख पैसे देण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसच्या या योजनेचा अनुभव गरीब कुटुंबांना मिळणार आहे. केंद्र सरकारने अशा संकटकाळात गरीबांना मदत करताना तातडीने प्रतिदिन 200 किंवा सहा हजार रुपये महिना या कुटुंबीयांच्या खात्यावर त्वरित जमा करावा, अशी मागणीही सत्यजीत तांबे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.