अहमदनगर - देशात आधीच वाद सुरू आहेत. त्यात आणखी शिर्डी साईंच्या जन्मस्थळाचा वाद नको. त्यामुळे, यासंदर्भात संप सुरू ठेवणे उचित ठरणार नाही, असे वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच साईबाबा सर्व जाती, धर्म, पंथांचे प्रतिक असल्याने त्यांच्या जन्मस्थळावरून कोणीही वाद निर्माण करू नये, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले. ते शिर्डीत बोलत होते.
भुजबळ पुढे म्हणाले, साईबाबांच्या जन्मस्थळाचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यासंदर्भात तेच या विषयावर अधिक बोलतील. मात्र, सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत बोलणे योग्य नाही . साईबाबांनीच आपल्या साईचरित्रात कोठेही उल्लेख केला नाही. जात, पात, धर्म साईबाबांनाच मान्य नव्हते. यापुर्वीही साईबाबांबद्दल अनेकांनी वाद घातले आहेत. तरी शिर्डीचे महत्त्व कमी झाले नाही.