अहमदनगर - राज्यात आपल्या कीर्तनातून हास्य फुलवत मार्मिकपणे प्रवचन करणारे हभप निवृत्ती काशीनाथ देशमुख अर्थात इंदोरीकर महाराज यांना त्यांनीच केलेल्या एका वक्तव्यामुळे आता अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पीसीपीएनडिटी सल्लागार समितीने त्यांना एकीकडे खुलाशीसाठी नोटीस धाडली असतानाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत येत्या सोमवारी पीसीपीएनडिटीच्या अहमदनगरच्या सल्लागार समितीचे प्रमुख जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे 'अंनिस'च्या राज्यसमनव्यक रंजना गवांदे यांनी सांगितले.
'सम तारखेस स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषय तारखेस संग झाल्यास मुलगी जन्माला येते', असे वक्तव्य हभप इंदोरीकर महाराज यांनी एका कीर्तनात केले होते. हा विषय सल्लागार समितीपुढे आला होता. सदरील व्हिडीओ आणि याबाबतची बातमी आल्यानंतर अहमदनगरच्या पीसीपीएनडिटी सल्लागार समितीने बैठक घेऊन इंदोरीकर महाराजांनी कायदाभंग केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून नोटीस काढली आहे. तसेच विविध सामाजिक संघटना, तृप्ती देसाई यांची 'भूमाता ब्रिगेड' आक्रमक झाल्या असतानाच 'अंनिस'च्या वतीनेही या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.