अहमदनगर - कोपरगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने येथील नागरिकांनी येत्या २९ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात १२ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हा निर्णय घेतला.
येथील नागरिकांनी कोपरगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये २९ एप्रिलपर्यंत पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कोपरगावमध्ये १२ दिवसाआड पाणी, नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार शहरात १२ दिवसआड पाणी पुरवठा होत असल्याने शहराला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडावे, या मागणीसाठी नागरिकांनी पाणी संघर्ष समितीच्यावतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
नागरिकांनी तहसील कचेरीपासून नगरपालिकेवर मोर्चा काढून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनाही आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी वकील संघाच्यावतीनेही निवेदन देण्यात आले. १५ दिवसांच्या आता निवेदनाची दखल घेत पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल. त्याबरोबरच शहरामध्ये बंद पाळण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.