शिर्डी - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साई मंदिर बंद असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांवर आणि त्याच्या ओघाने देणगीवर मोठा परिणाम झाल आहे. शिर्डी साई बाबा संस्थानला दररोज जवळपास दीड कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान होत आहे. तर, रामनवममी, गुरुपौर्णिमा, दसरा (साई पुण्यातिथी) उत्सवाच्या दरम्यान तीन दिवसांत तब्बल 4 कोटी रुपयांपर्यंत देणगी येत होती. मात्र यंदा सर्वच उत्सवांवर कोरोनाचा परिणाम पाहायला मिळाला. साईबाबांच्या तीन दिवसीय पुण्यतिथी उत्सवात भाविकांनी एकूण 38 लाख 10 हजार 832 रुपयांची देणगी दिली आहे. हा आकडा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.
कोरोनाचा देणगीवर परिणाम
मंदिर बंद असल्याने भाविक देणगी देण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचाही मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. ऑनलाइन पद्धतीने 2 कोटी 53 लाखांहून अधिक रुपये दान देण्यात आले आहे. साई पुण्यतिथी उत्सवात म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने 28 लाख 63 हजार रुपयांची देणगी दिली आहे. तर साई मंदिराच्या चार नंबर गेटजवळील देणगी काऊंटरवर 4 लाख 58 हजारांची रोख स्वरूपात देणगी अर्पण करण्यात आली आहे.