अहमदनगर - औरंगाबाद जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी नगर जिल्ह्यात आलेल्या कुटुंबातील पाच वर्षीय अक्षरा अनिल राठोड या चिमुरडीला सर्पदंश झाल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला. नगरच्या जिल्हा रुग्णालयाची अक्षम्य हेळसांड याला जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. खासगी रुग्णालयात सुद्धा दखल न घेतल्याने पाच वर्षीय अक्षराचा दुर्दैवाने मृत्यू झाला. याप्रकारामुळे आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी टाहो फोडला. यावर बोलण्यास रुग्णालयाचे वरिष्ठ तयार नाहीत.
सर्पदंश झालेल्या अक्षराला वेळीच उपचार न मिळाल्याने तीचा मृत्यू झाला हेही वाचा -शिर्डीत एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा; बहीण-भावाचा मृत्यू
बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास राहुरी तालुक्यातील जांभळी या ठिकाणी ऊस तोडणी मजूर कुटुंबातील अक्षरा अनिल राठोड या पाच वर्षीय चिमुरडीला सर्पदंश झाला. त्यानंतर तिला कुटुंबातील सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, संगमनेर साखर कारखान्याचे कर्मचारी यांनी तातडीने खासगी वाहनातून नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, यावेळी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णाला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर शहरातील तीन ते चार खासगी रुग्णालयात गेल्यानंतर कोणत्याही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवली. अखेर अक्षराला पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्यानंतर तिला दाखल करून घेण्यात आले. मात्र, त्यानंतर केवळ पंधरा मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.
सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात आणले त्याचवेळी अक्षरा पूर्ण शुद्धीत होती. मात्र, तिच्यावर वेळेत उपचार सुरू होऊ न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. शासकीय रुग्णालयाचा हेळसांडपणा आणि खासगी रुग्णालयांची असंवेदनशीलता यात एका चिमुरडीने आपले प्राण गमावले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी आणि शासकीय रुग्णालयातील दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
हेही वाचा -अहमदनगरच्या शेवगावात दरोडा, दोन गंभीर जखमी