अहमदनगर-विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे उघडपणे युतीचे उमेदवार आणि त्यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असताना काँग्रेस पक्ष त्यांच्यावर काही कारवाई करणार आहे की नाही, असा उद्विग्न प्रश्न विचारणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा निरीक्षक आणि ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी काँग्रेसला लेखी पत्राद्वारे विचारला आहे.
राधाकृष्ण विखेंकडून पुत्राचा उघड प्रचार.. काँग्रेस कारवाई करणार की नाही, राष्ट्रवादीचा सवाल - पत्र
हे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी सहा एप्रिलला पाठवलेले आहे. मात्र, अद्याप काँग्रेसकडून याबद्दल काकडे यांना काय उत्तर मिळाले आहे, याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
या पत्रात काकडे यांनी म्हटले आहे की, राधाकृष्ण विखे यांचे पुत्र अहमदनगर दक्षिण मतदारसंघात युतीचे उमेदवार आहेत. मात्र, या मतदारसंघात राधाकृष्ण विखे हे सुजय विखे हे निवडून येणार, असे सांगतानाच जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बैठका घेत आघाडीच्या विरोधात प्रचार करत आहेत. हे सर्व होत असताना काँग्रेस पक्ष त्यांच्यावर कोणती कारवाई करणार की नाही? असा प्रश्न काकडे यांनी पत्रात उपस्थित केला आहे.
राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातील भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याने पक्षाने तातडीने यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काकडे यांनी काँग्रेसकडे केली आहे. हे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना अंकुश काकडे यांनी सहा एप्रिलला पाठवलेले आहे. मात्र, अद्याप काँग्रेसकडून याबद्दल काकडे यांना काय उत्तर मिळाले आहे, याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.