अहमदनगर - जिल्ह्यातील कोकणेवाडी येथील ठाकर वस्तीवर एका महिलेला बिबट्याने उचलुन नेल्याची ( Leopard attacks women ) घटना घडली आहे. शेळ्या बांधलेल्या पडवीत झोपलेली रखमाबाई तुकाराम खडके या अपंग महिलेस पहाटे चार वाजता बिबट्याने आपल्या जबड्यात पकडुन जंगलात नेऊन ठार केले ( Leopard attack on women ) आहे. या महिलेच्या भाचेसूनाच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. कोकणेवाडी गावात घटनेचे वृत्त कळताच सकाळी सहा वाजता ग्रामस्थांनी हातात काठ्या घेऊन जंगल शोधले असता रखमाबाई खडके हीचा मृतदेह आढळून आला.
रखमाबाई शेळ्या बांधलेल्या दारात झोपल्या होत्या -अकोले तालुक्यातील कोकणेवाडी शिवारात खडके वस्ती जवळ खडके कुटुंब राहते. धरणग्रस्त असल्याने एका खडकाळ माळरानावर त्यांनी शेती फुलवली आहे. सोबत दहा शेळ्या ते सांभाळतात. काल दुपारी रखमाबाई यांनी शेळ्या शेतात सोडल्या असताना चार वाजता बिबट्याने एका शेळीवर झडप मारून शेळी जंगलात ओढून नेले. याबाबत सायंकाळी जेवण झाल्यानंतर रखमाबाई शेळ्या बांधलेल्या दारात झोपल्या होत्या. पहाटे चार वाजता बिबट्याने रखमाबाईवर हल्ला करुन त्यांना जंगलात ओढून नेले.