अहमदनगर - कोविड संकटात आपले पालक गमावलेल्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांमुळे केंद्र सरकारची सामाजिक बांधिलकी दिसून आली. या योजनांमुळे अनाथ मुलांचे भविष्य घडण्यास मदत होणार असल्याचं भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, केविड योद्ध्यांनी केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपाच्या वतीने राहाता तालुक्यातील आश्वी आणि जोर्वे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम आरोग्य अधिकारी डॉ. तांबोळी, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह आशा वर्कर, नर्सिंग स्टाफ आणि खासगी डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना विखे पाटील म्हणाले की, मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली, खरे तर आनंदोत्सव साजरा व्हायला पाहिजे होता. पण तसे न करता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितल्याप्रमाणे सेवा ही संघटन माणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशात कोविड संकटाने थैमान घातले असताना पंतप्रधान मोदींनी अतिशय धैर्याने परिस्थितीवर मात केली. पहील्या लाटेत आत्मनिर्भर योजना जाहीर करून देशातील सामान्य माणसाला आधार दिला. आता दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनसह आरोग्याची साधने त्यांनी उपलब्ध करून दिली. तसेच मोदींनी परदेशातून सुद्धा भारतासाठी मोठ्या प्रमाणात मदत आणली. एवढेच नव्हे तर ज्या मुलांनी कोरोनामुळे आपले आई-वडील गमावले आहेत त्यांच्यासाठी मोदींनी काही योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांमुळे त्यांचे भविष्य घडण्यास मदत होणार आहे.