अहमदनगर - परतीच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. खरीप हंगामातील एकूण लागवडीपैकी 30 टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकरी या संकटामुळे मेटाकुटीला आले आहेत. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून किमान एकरी 50 हजार रुपये भरपाई देऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा. केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांवरील या संकटाच्या काळात तातडीने केंद्रीय पथक पाठवावे व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपत्ती सहाय्यता निधीतून राज्य सरकारला पुरेशी मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी किसान सभा करत आहे.
पावसामुळे कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे खूप नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस व द्राक्ष पिकाचे तर कोकणात भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी, प्रत्यक्षात पंचनाम्यांची कार्यवाही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. शेतातील साचलेले पाणी व वाहून गेलेली शेती यांच्या नुकसानाची रास्त नोंद व्हावी, यासाठी पंचनाम्यांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. शिवाय पंतप्रधान पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार पिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल, यासाठी सुध्दा सरकारी यंत्रणांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या कृषी विभागाने याबाबत अत्यंत सतर्कतेने कार्यवाही करावी, अशी मागणी किसान सभेकडून करण्यात येत आहे.
परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानाची तातडीने भरपाई द्या - किसान सभा
खरीप हंगामातील एकूण लागवडीपैकी 30 टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकरी या संकटामुळे मेटाकुटीला आले आहेत. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना रास्त भरपाई द्यावी, अशी मागणी किसान सभेकडून करण्यात येत आहे.
अजित नवले
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हातचे पीक पाण्यावर तरंगत आहेत. तर, काही ठिकाणी पिके वाहून गेली असून पडीक जमीन तेवढी उरली आहे. आधी लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यातच आता खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.