अहमदनगर - दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या किरण काळे यांना वंचित बहुजन विकास आघाडीने नगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या यादीत त्यांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून पारनेरमधून डी.आर. शेंडगे, राहुरीमधून विजय तमनर, अकोलेतून दीपक पथवे, श्रीगोंदातून मच्छिंद्र सुपेकर, शिर्डीतून विशाल कोलगे, संगमनेर बापूसाहेब ताजणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या किरण काळे यांनी जगताप यांच्याशी असलेल्या तीव्र मतभेदांमुळे अचानक पक्षाचे सदस्यत्व व प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.