अहमदनगर -प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष सुरू असलेली कुस्तीपटू सोनाली मंडलिक कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील रहिवासी आहे. तिचे वडील शेतकरी तर, आई गृहिणी आहे. कुस्तीमध्ये देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी तिचे कठोर परिश्रम सुरू आहेत. पण तिला खरी गरज आहे ती, आर्थिक पाठबळाची.
अहमदनगरमधील 'गीता फोगट'ची व्यथा... सोनालीने 'खेलो इंडिया' स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले आहे. तिचे घर पत्र्यांचे आहे. आई चुलीवरच स्वयंपाक करते. घरातील शोकेस विविध पुरस्कार आणि चषक याने भरलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीशी तिचा संघर्ष सुरूच आहे. तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करायचे आहे.
कोरोनाच्या महामारीत करण्यात आलेला लॉकडाऊनचा तिच्या सरावावर परिणाम झाला. मात्र, कोणत्याही संकटासमोर न डगमगता, संघर्ष करत पुढे जायची जिद्द तिच्यात आणि तिच्या वडिलांच्यात आहे. तिच्या वडिलांना पाहिले की, डोळ्यासमोर दंगल चित्रपटातील आमीर खान उभा राहतो. त्याच्याचप्रमाणे सोनालीच्या वडिलांनी जवळच एक कुस्तीसाठीचा आखाडा तयार केला आणि सोनाली सराव सुरू ठेवला.
काहीही झाले तरी, परिस्थितीला चीतपट करायचेच, याच ध्येयाने सोनालीचा सराव सुरू आहे. किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ती कुस्तीचे डावपेच शिकत आहे. किरण मोरेदेखील तिच्यावर खूप मेहनत घेत आहेत. मात्र, एका कुस्तीपटूसाठी आवश्यक असलेल्या खुराकाचा प्रश्न त्यांना आहे. याचीच खंत किरण मोरेंना आहे.
सोनालीचे कठोर परिश्रम सुरू आहेत. त्याला तिच्या पित्याचीही साथ तेवढीच बळकट आहे. मात्र, आर्थिक पाठबळ नसणं, ही खरी अडचण त्यांच्यासमोर आहे. आजच्या घडीला सोनालीकडे केवळ कठोर परिश्रम आहे. तिला आर्थिक पाठबळाची अत्यंत गरज आहे. तिची तळमळच सांगते की, आपल्या कर्तृत्त्वाचा झेंडा तिला सातासमुद्रापार फडकवायचा आहे. व. पु. काळेंच्या शब्दात सांगायचे झाले तर, गगनभरारीचे वेड रक्तातच असावे लागते. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.