अहमदनगर : कसबा आणि पिंपर चिंचवडी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवार जाहीर केले जात आहेत. तर ही पोटनिवडणूक परंपरेनुसार बिनविरोध व्हावी असे देखील सांगितले जात आहे. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी कसबा-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, असे स्पष्ट विधान केले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मिरी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके, पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारचा पोटनिवडणूकीत बंदोबस्त करा : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूरचा बालेकिल्ला उध्वस्त झाल्याने व जनतेचा कौल लक्षात आल्याने या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणखी पुढे ढकलत रडीचा डाव खेळला आहे. महिलांचा सन्मान करा अशी भाषा वापरणाऱ्या राज्यकर्त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी दिली नसून या सरकारचा पुण्याच्या पोटनिवडणुकीत बंदोबस्त करा, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली.
राज्य सरकार घटनाबाह्य : अजित पवार पुढे म्हणाले की सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगासमोर खटला चालू असतानाही सत्तेवर आलेले हे सरकार घटनाबाह्य आहे. सध्याचे राज्यकर्ते व त्यांचे बगलबच्चे बेताल वक्तव्ये करत महापुरुषांचा अवमान करत आहे. हे सरकार सत्तेवर येऊन अनेक महिने झाले असले तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. अनेकांना मंत्रिपदाचे गाजर दाखवल्याने काही आमदारांनी सूट शिवून घेतले आहे तर काहींनी देवाला मंत्रिपद मिळावे, म्हणून नवस केले आहेत. सध्या त्रेचाळीस जण मंत्री पाहिजे होते, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची यांनी भीती वाटत आहे. राज्याची अशी अवस्था आपण यापूर्वी कधी पहिली नव्हती, असे सांगत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.