शिर्डी साईबाबांच्या तिजोरीची चावी के. एच. बगाटेंच्या हाती, श्रीकृष्ण जन्माष्टमीदिनी 'या' पदाचा स्वीकारणार कार्यभार - शिर्डी श्रीकृष्ण जन्माष्टमी बातमी
सरकारकडून सोमवारी कान्हुराज बगाटे यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी या पदावरून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गेल्या डिसेंबर महिन्यातच के. एच. बगाटे यांची रत्नागिरीला बदली झाली होती.

शिर्डी (अहमदनगर) - शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य सरकारने सोमवारी के. एच. बगाटे यांची नियुक्ती केली. साई संस्थानचे चौथे सीईओ म्हणून बगाटे हे उद्या मंगळवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
कान्हुराज बगाटे यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी या पदावरून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गेल्या डिसेंबर महिन्यातच के. एच. बगाटे यांची रत्नागिरीला बदली झाली होती. पंधरा दिवसापूर्वी त्यांची तेथून बदली झाली होती. त्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. यापूर्वी बगाटे यांनी नंदूरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पात अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरही काम केलेले आहे. याशिवाय नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. गेल्या 23 जुलैला अरुण डोंगरे यांची मुंबईला म्हाडामध्ये बदली झाली आहे. सध्या साई संस्थांनचा मुख्य कार्यकारी अधिकारी पद संस्थानचे डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे यांच्याकडे आहे.