महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना कामावर पुन्हा रुजू करा; जनआधार संघटनेचे उपोषण

मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना देण्यात आले होते. पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत अद्यापही कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारामध्ये आमरण उपोषण चालू करण्यात आले आहे.

fast
fast

By

Published : Dec 22, 2020, 7:02 PM IST

Updated : Dec 22, 2020, 7:15 PM IST

अहमदनगर - जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत असलेल्या सुरक्षारक्षकांना कामावरून काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. त्यांना पुन्हा कामावर रुजू करून न्याय देण्याची मागणी, जनाधार सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना देण्यात आले होते. पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत अद्यापही कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारामध्ये आज (२२ डिसेंबर)पासून आमरण उपोषण चालू करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, गणेश निमसे, दीपक गुगळे, महाराष्ट्र राज्य सचिव अमित गांधी, मच्छिंद्र गांगर्डे, शहराध्यक्ष भिंगार अजय सोळंकी, शहर उपाध्यक्ष संतोष उदमले, स्वाभिमानी सुरक्षारक्षक कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर मुरकुटे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

वरिष्ठ कार्यालयाचा आदेश धुडकवल्याचा आरोप

दोन वर्षापासून अहमदनगर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामार्फत 17 सुरक्षारक्षक जिल्हा रुग्णालयात सुरक्षेचे काम करत होते. या सुरक्षारक्षकांनी 7 महिने कोरोनाच्या संकटकाळात चोख पद्धतीने आपले कर्तव्य बजावले. तरी रुग्णालयाने मागील नऊ महिन्याचे त्यांचे वेतन थकवले होते. यासाठी नाशिक विभागाने निधीची पूर्तता केली होती. परंतु कार्यालयीन हलगर्जीपणामुळे 1 कोटी 30 लाख 74 हजार एवढा निधी मागे गेला. सुरक्षारक्षकांना वेतन वेळेवर झाले असते, तर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली नसती. नाशिक विभाग उपसंचालक मंडळाने या सुरक्षारक्षकांना कामावर रुजू करून घेण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला विनंती अर्ज केला होता. परंतु रुग्णालय प्रशासनाने सुरक्षारक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ केली आणि सुरक्षारक्षकांविरोधात चुकीची माहिती नाशिक विभागाला कळवली आहे.

मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण

जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न दुसर्‍या संस्थेकडून गार्ड घेण्याचे आहे. या सुरक्षारक्षकांनी नाशिक विभागाला संपर्क करायला नको होता, असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे होते. हाच राग मनात धरून पगार वारंवार मागू नये, यासाठी सुरक्षारक्षक बदलून घेण्याचे ठरविले आहे. सर्व सुरक्षारक्षकांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वारंवार पगाराची मागणी करणार नाही, आपल्या अटी व शर्ती मान्य असल्याचे लिहून देण्यास तयार होते. तरीदेखील त्यांना हजर करून न घेता इतर कंत्राटी कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचा मनमानी कारभार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा कामावर रुजू करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Last Updated : Dec 22, 2020, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details