शिर्डी :ED, CBI मार्फत लोकांची घरं फोडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी भाजपा सरकारकडं पैसा आहे. पण, अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीसाठी पैसा नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्या आज शिर्डीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू असल्याची टीका देखील केलीय.
महायुती सरकार अत्यंत असंवेदनशील :अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आज शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. अंगणवाडी सेविका गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत. मात्र, या अंगणवाडी सेविकांना सरकारनं पगारवाढ दिली नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. यावरून राज्यातील महायुती सरकार अत्यंत असंवेदनशील असल्याचं दिसून येतं, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
अन्यथा माफी मागा : एकेकाळी भारतीय जनता पक्ष होता. मात्र, आता भाजपा भ्रष्ट, जुमलेबाजीचा पक्ष झाल्याची टीका सुळे यांनी केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट जुमलेबाज पक्षानं आरोप केले होते. ईडी, सीबीआयनं त्यांची चौकशी केली. पण, मुश्रीफ यांच्या पत्नीनं ईडी, सीबीआय विरोधात लढा दिला. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण, आज मुश्रीफ भाजपा सरकारमध्ये आहेत. याच भाजपाचे समरजित घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळं मुश्रीफ यांच्यावरील आरोप, खरे की खोटे हे जुमला पक्षानं सांगायला हवं. मात्र, आरोप खोटे असल्यास समरजित घाडगेसह भ्रष्ट, जुमलेबाज पक्षानं राष्ट्रवादीची माफी मागावी, अशी मागणी देखील सुळे यांनी केलीय.