अहमदनगर- आबालवृद्धांचे लाडके दैवत गणराय आज भूतलावरील लाडक्या भक्तांचा पाहुणचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत. बाप्पांच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. नगर शहरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील श्रीविशाल गणपती मंदिरात सकाळी उत्सवमूर्तींची विधीवत पूजा अर्चा होऊन श्रींची प्रतिष्ठानपना झाली.
श्रीविशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उत्सवमूर्ती श्रींची प्रतिष्ठापना
अहमदनगरमध्ये बाप्पांच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. नगर शहरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील श्रीविशाल गणपती मंदिरात सकाळी उत्सवमूर्तींची विधीवत पूजा अर्चा होऊन श्रींची प्रतिष्ठापना झाली.
परंपरेप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी सपत्निक प्राणप्रतिष्ठा पूजा केली. सोशल डिस्टन्सींग राखत मोजक्याच विश्वस्थानच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, पंडितराव खरपुडे, अशोक कानडे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नगरमधील मानाच्या गणपती मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विशाल गणपती मंदिरातही यंदा भाविकांना प्रत्यक्ष दर्शन मिळणार नसले तरी मंदिरात दहा दिवस होणारे धार्मिक कार्यक्रम, आरती भाविकांना सोशल मीडियातून थेट पाहता येणार आहे.
पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी नगरकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणाने साजरा करून सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर, गर्दी टाळणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.