अहमदनगर- राहुरी तालुक्यातील कुरणवाडी परिसरात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात दहशत पसरली. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला पिंजरा लावून पकडले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
कुरणवाडी परिसरात जखमी अवस्थेत आढळला बिबट्या - Forest Department
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात कुरणवाडी परिसरात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात दहशत पसरली.
कुरणवाडी येथील शेतकरी घमाजी शिवराम खिलारी यांच्या शेतामध्ये पहाटेच्या वेळी कांद्याच्या शेतात शेतमजुरांना बिबट्या बसलेला दिसला. त्यामुळे जवळपासचे शेतकरी भयभीत झाले होते. ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बिबट्या जखमी असल्याचे दिसून आले.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्यासमोर पिंजरा ठेवला. त्यावेळी बिबट्याने पिंजऱ्यात उडी घेतली. जखमी बिबट्याला डिग्रस नर्सरीत पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले असून जुन्नर येथील डॉक्टरांचे विशेष पथक उपचारासाठी येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.