महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे राजकारण नको - इंदोरीकर महाराज

किर्तनकार ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांनी मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रे दरम्यान संगमनेरच्या सभेतील स्टेजवर येऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. त्यावर आज त्यांनी प्रतिक्रीया देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेताना इंदोरीकर महाराज

By

Published : Sep 14, 2019, 4:31 PM IST

Updated : Sep 14, 2019, 5:27 PM IST

अहमदनगर- किर्तनकार ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांनी मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेदरम्यान संगमनेरच्या सभेतील स्टेजवर येऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने महाराज भाजपत प्रवेश करतात की काय आणि बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात युतीकडून इंदोरीकर महाराज निवडणुक लढवणार, अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज इंदोरीकर महाराजांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या भेटीचे स्पष्टीकरण सोशल मीडियावर दिल्याने या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराज संगमनेर विधानसभा मतदार संघातून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवणार, अशा आशयाची पोस्ट काल (शुक्रवार) पासून व्हायरल होत होत्या. मात्र, आज इंदोरीकर महाराज यांनी सोशल मीडियावर आपली एक पोस्ट केली आहे. मी, माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी गेलो नव्हतो. समाजासाठी माझे काहीतरी देणे लागते आणि माझ्या व्यग्र कार्यक्रमांच्या दैनंदिन जीवनात मला समाजासाठी जी काही मदत करायची असती ती करता येत नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना मी स्वतः एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यासाठी त्यांच्या भेटीला गेलो असल्याचे इंदोरीकर महाराज म्हणाले. तसेच मी कुठल्याही प्रकारचा राजकिय हेतू मनामध्ये ठेवलेला नव्हता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी तो एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला व कुठल्याही पक्षाची ऑफर गळ्यात न घालता तिथून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी निघून गेलो.


जर मला राजकारणात किंवा निवडणुकीत उतरायचे असते. तर मी संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तिथेच थांबून राहिलो असतो. परंतु मी समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे. राजकारणात मी कधीही येणार नाही. संगमनेर तालुक्याचे नेतृत्व देखील खूप सुसंस्कृत आणि विकासात्मक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी मी स्वतः समाजासाठी करत आलो आहे. माझ्या स्वतःच्या शाळेसाठी स्व. भाऊसाहेब थोरात यांनीच पहिली वर्गणी दिलेली आहे. आज देखील आमदार बाळासाहेब थोरात हे शाळेला नेहमी मदत करत असतात. मी कधीही या गोष्टीचा विसर पडू देणार नाही. मी सर्व माझ्या हितचिंतकांना व श्रोत्यांना सांगू इच्छितो की, मी कधीही राजकारणात येणार नाही. समाजकार्याचा वसा मी हाती घेतलेला आहे. तो माझ्याकडून निरंतर सुरू राहील. त्यामुळे संगमनेर विधानसभा उमेदवारी बाबत माझ्या नावाच्या काही चर्चा सुरू आहेत. त्यांना मी आजच जाग्यावर पूर्णविराम देतो, अशी पोस्ट स्वतः ह.भ.प निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली असल्याने सर्वच राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Last Updated : Sep 14, 2019, 5:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details