CISF सुरक्षेला ग्रामस्थांचा विरोध शिर्डी(अहमदनगर) : शिर्डीच्या साई मंदिराच्या सुरक्षेसाठी साई संस्थान, महाराष्ट्र पोलिसांऐवजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) सुरक्षा व्यवस्था देण्याच्या हालचाली सुरु आहेत. प्रस्तावित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलास शिर्डीकरांचा विरोध आहे. त्यासाठी येत्या एक मे रोजी शिर्डी बंदचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, ही CISF ची सुरक्षा व्यवस्था कधी व किती सुरक्षा कर्मचारी असणार आहेत याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.
करोडो रुपये दान -सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी देश- विदेशातील करोडो भाविक येत असतात. दररोजचा विचार केला तर साधारणतः 70 ते 80 हजार भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. हिच संख्या गुरुपौर्णिमा, श्रीरामनवमी, साईबाबा पुण्यतिथी उत्सव दरम्यान लाखोंच्यावर जाते. त्याचबरोबर या भाविकांकडून वर्षाकाठी 450 ते 500 कोटीचे दान साई संस्थांनला वेगवेगळ्या स्वरुपात प्राप्त होते. भाविकांकडून येणाऱ्या दानाचा वापर साईबाबा संस्थान भाविकांच्या व्यवस्थेसाठी तसेच शिर्डीतील विविध विकासकामांसाठी खर्च करत असते.
मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था :साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा साई संस्थानचे 834 सुरक्षा कर्मचारी करत आहेत. तर, साईबाबा मंदिरात येण्या-जाण्यासाठी एकूण 5 गेट आहेत. या गेटवर एकूण 70 महाराष्ट्र पोलिसांची कुमक नेमण्यात आली आहे. याचबरोबरीने दररोज साईबाबा समाधी मंदिर तसेच मंदिर परिसरात बॉम्ब शोधक पथक, बीडीडीएस पथकाकाडून मंदिराची तपासणी केली जाते. विविध क्षेत्रातील व्हीव्हीआयपी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी 8 क्यूआरटी जवानांची नेमणूक केलेली आहे.
दहशदवादी हल्ल्यामुळे सुरक्षेत बदल :काही वर्षांपूर्वी शिर्डीतील साई मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे पत्र आले होते. त्याचवेळी दहशतवाद विरोधी पथकाने साई मंदिरावर दहशतवादी धोक्याची माहिती दिली होती. त्यामुळे साईबाबा मंदिराला दुहेरी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मात्र या सुरक्षा यंत्रणेऐवजी साईबाबा मंदिरात सीआयएसएफची सुरक्षा असावी, अशी चर्चा सुरू झाली.
न्यायालयात याचिका दाखल - कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने साई संस्थेचे मत मागवले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल नेमणूकीबाबत उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानचे म्हणणे मागवले आहे. कदाचित साई संस्थान या सुरक्षा व्यवस्थेला मंजुरी देऊ शकते, असा अंदाज ग्रामस्थांना आल्याने ग्रामस्थांनी या विरोधात लढण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निधी जमविण्सासाठी दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांनी शिर्डीत भिक्षा झोळी आंदोलनही केले
एक मे रोजी शिर्डी बंद :आज शिर्डीतील सर्व पक्षीय नेते, ग्रामस्थांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत प्रामुख्याने साई मंदिराला CISF सुरक्षा नको, तसेच अन्य चार मागण्या घेवुन शिर्डी ग्रामस्थ एक मे रोजी महाराष्ट्र दिना पासुन शिर्डीशहर बेमुदत बंद आंदोलन सुरू करणार आहे. तसेच 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता ग्रामदैवत हनुमान मंदिरा जवळ ग्रामसभा घेवून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे शिर्डी ग्रामस्थ नितीन कोते यांनी सांगितले आहे.
शिर्डीत काय सुरू, काय बंद? :साईबाबा मंदिर भाविकांनासाठी खुल राहणार, साईबाबा संस्थानचे सर्व भक्त निवास सुरू राहणार, साईबाबा प्रसादलय,भोजनालय सुरू राहणार, साईबाबा संस्थानच्या सर्व सुविधा भाविकांनासाठी सुरू राहणार आहे, साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची राहण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी गेस्ट हाऊस, लॉजिंग सुरू ठेवणार, इतर सर्व व्यवसाय पूर्ण पणे बंद ठेवण्यात येणार.
काय आहेत शिर्डीकरांच्या मागण्या :साईबाबा मंदीराला CISF सुरक्षा व्यवस्था नको, आहे तीच सुरक्षा योग्य आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद IAS अधिकारीकडे नको, उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकारी यांच्याकडे हे पद असावे. साईबाबा संस्थानचे सध्या पाहत असलेले तदर्थ समितीमुळे सर्व कारभार मंदावलेला असुन सर्व निर्णय प्रलंबित आहे. तर यावर राज्य शासनाने नियुक्त समिती नेमावी. शिर्डी साईबाबा संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमणूक करण्यात यावे. यात शिर्डीतील 50℅ विश्वस्त नेमणूक करावेत.
हेही वाचा - Uday Samant on MLAs : राज्याच्या राजकारणात आणखी फोडाफोडी, ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे गटाच्या गळाला लागणार?